नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत उपमुखमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. यावेळी केंद्राचे अर्थ मंत्रालय चालवण्यासाठी तुम्ही महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ शकता, असा सल्लाच सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारला दिला आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या कि, हा केंद्रीय आणि राज्याच्या अर्थमंत्र्यांमधील मूलभूत फरक आहे. मोदी सरकारच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील प्रत्येक खासदाराचे १२ कोटी रुपये न विचारता परस्पर घेऊन टाकले. आता लोक म्हणतात खासदार निधी द्या. पण तो तर मोदीजी घेऊन गेले. आता अडीच वर्षांसाठी काहीच मिळणार नाही.
याउलट राज्याच्या अर्थमंत्री अजित पवार यांनी सुनिश्चित केले कि प्रत्येक आमदाराला मग तो विरोधी पक्षातला असू दे त्यांना ५ कोटी रुपयांचा निधी प्रत्येक वर्षाला मिळेल. यात कपात करण्यात आलेली नाही. केंद्राकडून जीएसटी येत नसतानाही राज्य सरकारकडून योग्य व्यवस्था केली जात आहे. तुम्ही त्यांच्याकडून काहीतरी नक्की घेऊ शकता. त्यामुळे केंद्राचे अर्थ मंत्रालय चालवण्यासाठी तुम्ही महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून थोडे तरी मार्गदर्शन घेऊ शकता, असे सुळे यांनी म्हंटले आहे. दरम्यान, करोनाविरुद्ध लढण्यासाठी २ वर्षासाठी खासदार निधी तहकूब करण्यात आला. या निर्णयावर सर्वच स्तरातून टीका करण्यात आली होती.







