जळगाव;- चाळीसगाव तालुक्यातील हातगाव येथील पाच संशयित आरोपीचा अटक पूर्व जामिन आज जिल्हा व सत्र न्यायालयाने नामंजूर केला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील हातगाव ग्रामपंचायत निवडणूकीत अनिल सुरेश नागरे (वय-२४) हे शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. गेल्या महिन्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत अनिल नागरे यांच्या आई गुंताबाई सुरेश नागरे ह्या १ मतांनी पराभव झाला. त्या कारणावरून २० जानेवारी २०२१ रोजी गावातील शंकर पांडू सानप, अमोल शंकर सानप, विलास शंकर सानप, भैय्या लालकिसन नागरे आणि बापू लालकिसान नागरे यांनी अनिल नागरे यांच्यासह त्यांच्या आईवडीलांशी भांडण केले. या भांडणाची व्हिडीओ क्लिप गावातील एका व्हॉटसॲप गृपवर व्हायरल केली होती. याचे वाईट वाटून अनिल सुरेश नागरे यांनी शंकर पांडू सानप यांच्या शेतात जावून झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापुर्वी अनिल नागरे यांनी त्यांच्या व्हॉटसॲपवर व्हाईस रेकॉर्ड करून संबंधित संशयित आरोपींचे नावे सांगत त्यांच्यामुळे आपण आत्महत्या करत आहे असे सांगून आत्महत्या केली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आज जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात खटल्यात संशयित आरोपींनी अटकपुर्व जामीन अर्ज केला होता. न्यायमुर्ती आर.जे.कटारिया यांनी जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. सरकार पक्षातर्फे स.सरकारी वकील ॲड. सुरेंद्र काबरा व ॲड. धिरज पांडे यांनी कामकाज पाहिले.








