मुंबई (वृत्तसंस्था) – केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे मागील दोन महिन्यांपासून आंदोलन सुरुच आहे. शेतकरी आंदोलनावर इंटरनॅशनल पॉपस्टार रिहानाने ट्विट केले आणि त्यानंतर देशभराचत ट्विटर युद्ध पाहायला मिळालं. रेहानाच्या ट्विटनंतर खेळाडू, बॉलिवूड कलाकारांनी ट्विट करत, भारताला विभागण्याचा प्रयत्न होत असून, तसे होऊ देऊ नका असं आवाहन सेलिब्रेटींनी केले होते. यावरून आता केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील ठाकरे सरकार आमने-सामने आले आहे.

शेतकरी आंदोलनासंदर्भात सेलिब्रेटींनी केलेल्या ट्विटबद्दल शंका व्यक्त केली होती. यावर विरोधकही चांगले तापले असून, मोदी सरकार या कलाकारांवर दबाब टाकत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कलाकारांनी केलेल्या ट्विटची चौकशी करणार असल्याचं सांगितलं आहे. या संदर्भात चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी गृहमंत्र्यांकडे मागणी केली आहे. कलाकारांवर दबाब टाकण्यात आला असून, त्यांना ट्विट करण्यासाठी भाजपने त्यांना भाग पाडले असा आरोप काँग्रेसने केला आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने यासर्व प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असून, गुप्तहेर विभाग याची चौकशी करणार आहे. ‘कोणीही व्यक्तिगत पातळीवर मत व्यक्त करत असेल तर त्यावर आक्षेप असण्याचं कारण नाही. पण ट्विटची वेळ आणि भाषा पाहिली तर हे भाजपाच्या स्क्रिप्टनुसार करण्यात आलं का ? याबाबत शंका निर्माण होते. तसेच अक्षय कुमार आणि सायना नेहवाल या दोघांचे ट्विट सारखेच होते. त्यामुळे याप्रकरणाची चौकशी केली जाणार असं काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले.







