मुंबई: दिल्लीतील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. त्यामुळे दिल्लीतील हिंसाचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेच जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला. ते रविवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी दिल्लीतील हिंसाचारावरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले
केंद्रीय मंत्रीच ‘गोली मारो’ अशी चिथावणीखोर वक्तव्ये करतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष दौऱ्यावर असताना दंगली पेटतात. समाजातील एका वर्गाला इतरांपासून तोडण्याचा प्रयत्न होतो. देशाच्या राजधानीला सध्या आग लागली आहे. विधानसभेत यश मिळाले नाही म्हणून दिल्लीत जातीय दंगली भडकावल्या जात आहेत. या माध्यमातून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका यावेळी शरद पवार यांनी केली.