मुंबई (वृत्तसंस्था) – चार वर्षांपूर्वी नारायण राणे यांनी कुडाळा तालुक्यातील पडवी गावात खासगी ७० एकर जमिनीवर सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलच्या बांधकामाला सुरुवात केली होती. मागच्या सात दशकांपासून सिंधुदुर्ग जिल्हा चांगल्या दर्जाच्या वैद्यकीय सुविधांपासून वंचित असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले. भाजपा खासदार नारायण राणे यांनी कोकणात खासगी वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटल बांधले आहे. या हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी अमित शाह उद्या रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत.
दरम्यान, नारायण राणे राज्यसभेत भाजपाचे प्रतिनिधीत्व करतात. कोकणातील वजनदार नेते अशी त्यांची ओळख आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघातून त्यांनी सलग सहावेळा निवडणूक जिंकली आहे. आज सहा फेब्रुवारीला अमित शाह यांच्या हस्ते रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन होणार होते. पण शेतकऱ्यांनी आज देशभरात चक्का जाम आंदोलनाची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर नियोजित कार्यक्रमात बदल करण्यात आला. आता उद्या हा उद्घाटन सोहळयाचा कार्यक्रम पार पडणार आहे. एसएसपी वैद्यकीय रुग्णालयाकडून ही माहिती देण्यात आली.







