मुंबई (वृत्तसंस्था) – दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरुन पॉपस्टार रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांनी केलेल्या टिप्पणीला सचिन तेंडुलकर याच्याकडून अप्रत्यक्षपणे प्रत्युत्तर देण्यात आलं. “भारताच्या सार्वभौत्माविषयी कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. भारतामधील घडामोडींबाबत देशाबाहेरील लोक प्रेक्षक असू शकतात, पण त्यांनी हस्तक्षेप करता कामा नये”, असं सचिनने ट्विटमधून ठणकावून सांगितलं. मात्र, या ट्विटवरुन अनेकांनी त्याच्यावर टीका केली आहे.
दरम्यान, भारतीय युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कोचीत माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या पुतळ्यावर काळे तेल टाकत निषेध व्यक्त केला. एएनआयने याबाबत ट्विटद्वारे माहिती दिली आहे. दरम्यान, या घटनेबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी निषेध व्यक्त केला आहे. ‘आपण सचिन तेंडुलकरच्या मताशी असहमत किंवा सहमत होऊ शकता, पण आपल्या खेळाने जागतिक स्तरावर देशाचे नाव उंचावणाऱ्या अशा खेळाडूचा अपमान तेच करू शकतात, ज्यांची विचारधारा व देशाप्रतीच्या निष्ठेत खोट असेल. हा केवळ भारतरत्न सचिन तेंडुलकरचा अपमान नाही, तर भारताचा व प्रत्येक भारतीयांचा अपमान आहे’,असं ट्विट चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.







