नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांकडून जोरदार विरोध केला जात आहे. त्यानुसारच गेल्या 50 पेक्षा अधिक दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. याच मुद्द्यावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले.
कृषी कायद्यावर केंद्र सरकारची बाजू मांडताना तोमर बोलत होते. त्यादरम्यान विरोधी पक्षातील नेत्यांनी शेतकरी आंदोलन आणि नव्याने लागू होत असलेल्या 3 कृषी कायद्यांना ‘काळा कायदा’ म्हणून संबोधले. त्यानंतर तोमर यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, ‘या कायद्यात काळं काय आहे हे तरी सांगावे. शेती ही पाण्याने होते. मात्र, फक्त काँग्रेसच असा पक्ष आहे जो रक्ताने शेती करू शकतो. तसेच ते पुढे म्हणाले, केंद्र सरकारचा कायदा राज्य सरकारचा टॅक्स बंद करण्याचा असतो. पण राज्य सरकारचा कायदा टॅक्स घेण्याची घोषणा करतो. जे कोणतं राज्य अशाप्रकारे टॅक्स घेऊ इच्छिते त्यांच्याविरोधात आंदोलन होणे गरजेचे आहे. मात्र, इथं नदी उलट्या दिशने वाहत आहे.
नरेंद्रसिंह तोमर यांनी हेदेखील सांगितले, की पंजाब सरकारच्या कायद्यानुसार जर शेतकरी चूक करेल तर त्याला शिक्षा होते. मात्र, केंद्र सरकारच्या या कायद्यात अशी कोणतीही बाब नाही.
फक्त एका राज्यातील शेतकऱ्यांना बहकाविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना भीती दाखवली जात आहे. शेती पाण्यापासून होते, मात्र फक्त काँग्रेसच असा पक्ष आहे तो रक्ताने शेती करतो, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसवर टीका केली.







