नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – दिल्लीच्या सीमेवर मागच्या दोन अडीच महिन्यांपासून नव्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. सरकार आणि शेतकऱ्यांमधील बैठकांमधून कोणताही तोडगा अजूनही निघाला नाही. दरम्यान काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या अनोख्या शायरीच्या अंदाजात एक खास ट्विट केले आहे. या ट्विटमधून त्यांनी सरकारवर टीका केली आहे.
शेतकरी आंदोलन आणि एकंदर परिस्थितीवर शेरोशायरीच्या अंदाजात नवज्योत सिंग सिद्धू यांनी भाष्य केले आहे. ‘श्रीमंताच्या घरातील कावळाही मोर दिसतो’ असे ट्विटमध्ये म्हटले असून त्यांच्या या ट्विटची जोरदार चर्चा रंगली आहे.
नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक खास ट्विट केले आहे. ‘श्रीमंताच्या घरातील कावळा देखील मोर दिसतो आणि गरीबाच्या घरातील मुलं तुम्हाला चोर दिसतात का?’ असा थेट सवाल सिद्धू यांनी केला आहे. त्यांच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच प्रत्येक जण सिद्धू यांच्या ट्विटचा अर्थ आपआपल्या मतांनुसार लावत आहे आणि त्याची प्रशंसा किंवा टीका करत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या ट्विटची जोरदार चर्चा सुरू आहे. सिद्धू यांनी याआधी देखील अनेकदा कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलनावर आपली भूमिका स्पष्ट केली.
प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकऱ्यांचा आंदोलनाला हिंसक वळण लागले. नवज्योत सिंग सिद्धू यांनी काही दिवसांपूर्वी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केले होते. नवज्योत सिंग सिद्धू यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. ‘जर तुम्ही इतिहासाकडून काही शिकला नाहीत तर तो इतिहास पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती करतो. आजपर्यंत कोणतेही सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात जाऊन जिंकलेले नाही हेच इतिहासाने आपल्याला सांगितले आहे’ असे सिद्धू यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.







