नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संबंधात केंद्र सरकारने आता त्यांची चारही बाजूने नाकाबंदी करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. मोठमोठी बॅरिकेट्स टाकून त्यांचा संपर्क तोडला जात आहे. तर दुसरीकडे शेतकरी संघटना 6 फेब्रुवारीला देशव्यापी चक्का जाम आंदोलन करणार आहेत. सरकारने या भागात तारांचे कुंपण तसेच मोठमोठे बॅरिकेट उभे करून आंदोलकांची कोंडी करण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे त्याच्या विरोधात आंदोलकांनी तसेच राजकीय पक्षांनीही सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरू केला आहे. राजकीय पक्षांच्या या टीकेवर मध्य प्रदेशचे गृह मंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही मोठे विधान केले आहे.
नरोत्तम मिश्रा म्हणाले,’ हे शेतकऱ्यांचे आंदोलन हा एक प्रकारचा सराव आहे. हा सर्व हे यशस्वी ठरले, तर लोक यापूर्वीच्या सीएए-एनआरसी, कलम 370 आणि राम मंदिराच्या विरोधातही आंदोलन सुरू करतील. आंदोलन करणाऱ्यापैकी कुणालाही समजावता येईना, की कृषी कायद्यांमध्ये असे विरोध करण्यासारखे काळे काय आहे, ज्यांचा ते उल्लेख करत आहेत. ‘ असं म्हणत त्यांनी विरोधी पक्षासह हल्लाबोल केला आहे. दरम्यान, शेतकरी संघटना 6 फेब्रुवारीला देशव्यापी चक्का जाम आंदोलन करणार आहेत.







