नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – ट्रॅक्टर संचलनावेळी झालेल्या हिंसाचाराबद्दल गुन्हे दाखल झालेल्या शेतकरी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी लुकआऊट नोटिसा जारी केल्या. लाल किल्ल्यातील हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. या हिंसाचारासाठी जबाबदार धरले जात असलेल्या दीप सिद्धूसह, जुगराज सिंह, गुरजोत सिंह आणि गुरजंत सिंह आरोपींचा दिल्ली पोलीस शोध घेत आहेत.

यातच मिळालेल्या माहितीनुसार, या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी एसआयटीची स्थापना केली असून सर्व आरोपींवर प्रत्येकी एक-एक लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे. त्याशिवाय इतर काही आरोपींवर प्रत्येकी 50-50 हजार रुपयांचं बक्षीस ठेवण्यात आलं आहे.
दरम्यान, केंद्रीय कृषी कायद्यांना विरोध दर्शवण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी दिल्लीत केलेल्या ट्रॅक्टर संचलनाला हिंसाचार झाला. त्या हिंसाचारात एक आंदोलक मृत्युमुखी पडला, तर 394 पोलीस जखमी झाले. काही समाजकंटकांनी लाल किल्ल्यात तोडफोड केली होती. त्यानंतर हिंसाचाराबद्दल पोलिसांनी 37 शेतकरी नेत्यांविरोधातही गुन्हे दाखल केले होते.







