नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक असलेल्या भव्या लाल यांची ‘नासा’ या अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेच्या प्रमुख पदावर निवड झाली आहे. त्यांच्याकडे अभियांत्रिकी आणि अवकाश तंत्रज्ञान या दोन्ही क्षेत्रांचा प्रचंड अनुभव आहे.

भव्या लाल या अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या प्रेसिडेन्शियल ट्रान्झिशन एजन्सीचा भाग होत्या. 2005पासून जवळपास 15 वर्षं भव्या यांनी अमेरिकेतील इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स अॅनालिसिस सायन्स अँड टेक्नॉलॉजी पॉलिसी इन्स्टिट्यूट या संस्थेत संशोधक म्हणूनही काम केलं आहे.
लाल यांनी विज्ञान शाखेत शिक्षण घेतलं असून त्यांनी अणु शक्ती या विषयात पदवी आणि तंत्रज्ञान धोरण या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. तर जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठातून पब्लिक पॉलिसी अँड पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन या विषयातून डॉक्टरेट मिळवली आहे. अणुशक्तीच्या अवकाश संशोधनातील प्रभावी वापरासाठीच्या सेमिनार्समध्येही त्या यजमान म्हणून हजेरी लावतात.
नासाच्या अॅक्टिंग चीफ ऑफ स्टाफ या प्रमुख पदावर निवड होण्याआधीपासूनच त्यांनी अवकाश संशोधन, तंत्रज्ञान, वातावरणाशी निगडित संशोधन अशा विविध क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी केली आहे. नासाशिवाय त्यांनी संरक्षण संबंधित विभागांमध्येही काम केलं आहे.







