नवी मुंबई (वृत्तसंस्था) – ‘ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी नागरिकांना विजबिलात सवलत देण्याची घोषणा केली होती. मात्र, आता नागरिकांनी विजबिल न भरल्याने सरकारने वीज कनेक्शन तोडण्याची तयारी केलीय. त्यामुळे सरकारचा फ्यूज उडाला आहे,’ अशी बोचरी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलीय.

सर्वसामान्य जनतेला दिलेली आश्वासन पाळण्यात हे राज्य सरकार अपयशी ठरलंय. महाविकास आघाडी सरकारने जनतेला दिलेली आश्वासन फोल ठरली आहेत. जनता या सरकारला योग्य धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असेही चित्रा वाघ यांनी म्हटलंय.
कल्याण डोंबिवली महापालिकेचे अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या तर्फे कल्याणमधील आडिवली -ढोकळी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमामध्ये भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमाला महिला वर्ग अधिक संख्येने उपस्थित होता.
यावेळी महिलांना बचतगटांमार्फत शासकीय योजनांचा फायदा घेण्याचे आवाहन केले. तर कुणाल पाटील यांनी बचत गटांच्या नोंदण्या केल्या असून त्याचा फायदा घ्यावा. तसेच कुणाल पाटील भविष्यात आमदार झाले तर आनंद होईल, असेही त्या म्हणाल्या.
यावेळी समाजसेवक अनिल पाटील, समाजसेविका श्वेता पाटील यांसह महिला वर्ग सहभागी झाले होते. मध्य रेल्वेवर आजपासून सर्वसामान्य नागरिकांना प्रवासासाठी लोकलची सेवा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. मात्र, ही लोकल सेवा सर्वसामान्य जनतेला कोणत्याही प्रकारची फायदेशीर नाही. रेल्वे सुरू होण्याने नोकरदार वर्गाला फायदा होणार नाही, असेही वाघ म्हणाल्या.







