मुंबई (वृत्तसंस्था) – शहरात एकाच कुटुंबातील जास्तीतजास्त रुग्ण आढळल्याने खळबळ माजली आहे. इस्लामपुरात करोनाचे 25 रुग्ण आढळले आणि अवघ्या महाराष्ट्रात हाहाकार माजला. मात्र सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील हे न डगमगता परिस्थिती हाताळताना दिसत आहेत. करोनाबाधित रुग्ण आढळलेल्या शहरातील गांधी चौक परिसरात त्यांनी पाहणी केली. रात्री उशिरा लाईट नसल्याने बॅटरीच्या उजेडात परिसराचा आढावा घेतला. आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांच्या व्यवस्थेत कोणत्याही त्रुटी राहू नये, हाच आमचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया ना. पाटील यांनी दिली. या भेटी दरम्यान जयंत पाटील यांनी पोलीस प्रशासन, नगरपालिका प्रशासन यांच्याकडून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेचा आढावा घेतला. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, शासनाच्या नियमांचे पालन करावे आणि घरातच रहावे, असे आवाहन जनतेला केले आहे. मागील वर्षी आलेल्या महापुराने पश्चिम महाराष्ट्रात थैमान घातले होते. त्यावेळीही ना.जयंत पाटील अयांनी पूरग्रस्तांची मदत केली होती.