मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यात कोरोना चाचण्यांची सुविधा देशात सर्वाधिक महाराष्ट्रात असून 13 शासकीय आणि 8 खासगी प्रयोगशाळांच्या माध्यमातून दररोज 5500 चाचण्या करू शकतो, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ज्यात आतापर्यंत 6323 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या असून 5911 जणांचे नमुने निगेटिव्ह आल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात चाचण्यांची सुविधा वाढविण्यासाठी सुरूवातीपासून केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. राज्याच्या मागणीची दखल घेऊन केंद्र शासनाने शासकीय महाविद्यालय आणि खासगी प्रयोगशाळांना चाचण्यांसाठी परवानगी देण्यात आली आहे. सध्या राज्यात 13 शासकीय प्रयोगशाळांच्या माध्यमातून कोरोनाची चाचणी केली जात आहे. त्याद्वारे दररोज 2300 चाचण्या केल्या जाण्याची क्षमता आहे. आता त्यामध्ये अजून 3 शासकीय प्रयोगशाळांना मान्यता देण्यात येणार असून राज्यात शासकीय प्रयोगशाळांची संख्या 16 होईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.