नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचार आणि लाल किल्ल्यावर घडलेल्या घटनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रतिक्रिया दिली. ‘मन कि बात’ या कार्यक्रमामध्ये त्यांनी आज नागरिकांशी संवाद साधला. दिल्लीत २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिनी) रोजी तिरंगा ध्वजाचा अपमान पाहून देश खूप दुःखी झाला, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदींनी दिली आहे.

याआधी शनिवारी नरेंद्र मोदी म्हणाले कि, सरकार शेतकऱ्यांशी खुल्या दिलाने चर्चा करण्यास तयार आहे आणि कृषी कायद्यांना 18 महिने स्थगिती देण्याचा सरकारचा प्रस्ताव अजूनही कायम आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते.
दरम्यान, शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर संचलनानाला २६ जानेवारी रोजी हिंसक वळण लागले. त्यात सुमारे ३०० पोलीस जखमी झाले. आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर संचलनात काही समाजकंटकांनी संचलन लाल किल्ल्याकडे वळवल्याने अभूतपूर्व अशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. केवळ तिरंगा फडकावला जात असलेल्या लाल किलल्यावर धार्मिक ध्वजही फडकावण्यात आला.







