मुंबई (वृत्तसंस्था) – पुणे-मुंबईमहामार्गावरील एक गाडी बंदुक दाखवून ट्रकला ओव्हरटेक करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या गाडीच्या मागच्या काचेवर शिवसेनेचे वाघाचे चिन्ह आहे. या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

एका वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, कारमध्ये जे दोन तरुण पिस्तुलीचा धाक दाखवत होते ते मुळात शिवसैनिक नव्हते. उगाच आरोप करायचा म्हणून चुकीच्या पद्धतीने ते आरोप करण्यात आले होते, असे शंभुराजे देसाई यांनी म्हंटले आहे.
इम्तियाज जलील यांनी पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील एक व्हिडीओ ट्विट केला होता. या व्हिडीओमध्ये ट्रकच्या गर्दीमधून वाट काढण्यासाठी एक कारचालक ड्रायव्हिंग सीटवरुन उजव्या हातात पकडलेली रिव्हॉलव्हर गाडीच्या खिडकीबाहेर काढतो आणि ट्रकच्या रांगेमधून पलीकडच्या लेनमध्ये जाताना दिसतो. या गाडीच्या मागच्या काचेवर शिवसेनेचा लोगो असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे इम्तियाज जलील यांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आलेली आहे.







