नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) ;- मुरादाबाद-आग्रा महामार्गावर दाट धुक्यांमुळे विचित्र अपघात घडला आहे. दाट धुक्यातून वाट काढत भरधाव जाणारी मिनीबस डीसीएमला धडकली. त्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस एका ट्रकलाही धडकली. या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास घडली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच एसएसपी आणि जिल्हाधिकारीही घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे. दाट धुक्यांमुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुरादाबादच्या कुंदरकीजवळ नानापूर येथे हा अपघात झाला. एक मिनीबस डीसीएम आणि ट्रकला धडकली. अपघात भीषण असून यात तीनही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तर अपघातात 24 जण जखमी झाले आहेत.