जळगाव– जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलं असेल अशा सर्व शेतकऱ्यासाठी ३१ मार्च रोजी पीक कर्ज भरण्याची शेवटची मुदत होती . परंतु जळगाव जिल्हा बँकेचे चेअरमन रोहिणी खडसे खेवलकर, व्हाईस चेअरमन आमदार किशोर पाटील ,कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख तसेच जिल्हा बँकेचे सर्व संचालक सदस्यांनी याबाबत मुदतवाढीसाठी प्रयत्न केले होते . जळगाव जिल्हा बँकेने केंद्र शासन राज्य शासन नाबाड यांच्याशी पत्रव्यवहार करून मुदतवाढ मागितली होती. अखेर आज जिल्हा बँकेला तशा परवानगीचे पत्र प्राप्त झाले असुन कर्ज भरण्याची मुदत मे 2020 अखेरपर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली . तरी शेतकरी बंधूंनी कोणतीही काळजी न करता आपलं पिक कर्ज मे 2020 रोजी भरण्यास हरकत नसल्याचा निर्णय झाला असल्याचे त्यांनी कळविले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ३१ मेपर्यंत पिक कर्ज भरण्याला मुदतवाढ देण्यात आली. परंतु त्यातल्या त्यात ज्या शेतकऱ्यांची कर्ज भरण्याची परिस्थिती असेल त्या शेतकऱ्यांनी मात्र ३१ मार्च रोजी स्वखुशीने कर्ज भरायचं असेल तर त्यांनी ते भरावे. कारण जे शेतकरी ३१ मार्चला कर्ज भरतील त्या शेतकऱ्यांना पुन्हा एप्रिलला पिक कर्ज मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण दूर होईल. ज्यांना भरायचं असेल त्यांनी ३१ मार्चला भरावं किंवा मे अखेर भरावं असे संजय पवार यांनी कळविले आहे.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कोरोना विषाणूमुळे तसेच केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊनचा आदेश दिल्यामुळे तसेच माणसामाणसांमध्ये किमान दोन मीटर अंतर राहण्यासाठी विविध कार्यकारी सोसायटी च्या संचालक मंडळासाठी तसेच गटसचिव यांसाठी जिल्हा बँकेने कर्ज मागणीचे नवीन प्रस्ताव न मागवता मागील वर्षीच्या प्रस्तावांना मान्यता देण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा जिल्हा बँकेतर्फे फार मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेला आहे.