भडगाव ;- भडगाव येथील मास्टर लाईन या टायर गोदामाचे चॅनल गेट व आतील दरवाजा उघडून चोरट्यांनी सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे दुचाकींचे टायर लांबवले.
भडगाव-पाचोरा रस्त्यावरील मिनी एमआयडीसीत मास्टर लाईन हे टायर गोदाम आहे. २३ जानेवारीला सायंकाळी गोदाम बंद केले. दुसऱ्या दिवशी रविवारी सुटी होती. २५ जानेवारीला कर्मचारी कामावर आल्यावर चोरी समोर आली. ही घटना त्यांनी मालक समीर जैन यांना कळवली. त्यात चोरट्यांनी दुचाकीचे १९४ टायर चोरून नेल्याचे समोर आले. तसेच टायरसाठी चोरीसाठी चारचाकी वाहनाचा वापर झाल्याचा संशय आहे. सदरचे वाहन वीज वितरण कंपनीच्या बाजूला झुडपाजवळ अंदाजे दोनशे ते अडीचशे मीटर अंतरावर पार्क केले होते. श्वान पथक परिसरात घुटमळले. तपास पोलीस निरीक्षक अशोक उतेकर करत आहेत.







