मुंबई (वृत्तसंस्था) – आपण आज चित्रपट अथवा मालिकांमध्येच तुरुंगातील जीवनविषयी बघितले आहे. पण तुरुंग कसा असतो हे, जर प्रत्यक्षात बघायचे असेल, आजवर देशातील कोणत्याच राज्यात अशी व्यवस्था नव्हती. महाराष्ट्र सरकारने याच दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत तुरूंग पर्यटन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. ज्याची सुरूवात २६ जानेवारी २०२१ पासून होणार आहे. तुरूंग पर्यटन योजनाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार असून, राज्यातील इतर जेलचा यात टप्प्या टप्प्याने समावेश केला जाणार असून याबद्दलची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

पत्रकार परिषदेत याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात ६० तुरूंग असून या तुरूंगात जवळपास २४ हजार कैदी आहेत. तात्पुरत्या तुरूंगात ३ हजार कैदी आहेत. आम्ही जेल पर्यटनाची सुरूवात करत आहोत. त्याला विद्यार्थी व नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. याची सुरूवात २६ जानेवारीपासून केली जाणार आहे. मुंबईतून व्हिडीओ कॉन्फरन्सिद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याचे उद्घाटन करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार प्रत्यक्ष पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. आपण स्वतः गोंदियातून या कार्यक्रमाला हजर राहणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.







