जळगाव ;- उपमहापौर यांच्या जनता दरबाराला भरघोस प्रतिसाद मिळाला. शहराच्या विविध भागातील नागरीकांनी या खुल्या जनता दरबारात उपस्थिती लावून समस्यांबाबत च्या तक्रारी उपमहापौर सुनिल खडके यांच्याकडे मांडल्या.
महानगरपालिका प्रांगणात प्रथमच अशा प्रकारचा जनता दरबार भरवण्यात आला होता. महापौर सौ. भारतीताई सोनवणे, आयुक्त सतीश कुळकर्णी, स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील (घुगे पाटील ), माजी स्थायी समिती सभापती ॲड शुचिता हाडा, महिला व बालकल्याण सभापती सौ. रंजनाताई सपकाळे, पाणी पुरवठा सभापती अमित काळे, आरोग्य समिती सभापती चेतन सनकत, विद्युत समिती सभापती सौ. गायत्रीताई राणे, प्रभाग समिती सभापती मनोज आहुजा, अतिक्रमण समिती सभापती किशोर बाविस्कर, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, दिलीप पोकळे, सौ.रेश्माताई काळे, श्रीमती.सरिताताई नेरकर, यांच्यासह मुख्यलेखापरिक्षक संतोष वाहुळे, सहा. आयुक्त पवन पाटील, नगरसचिव सुनिल गोराणे, यांच्यासह महानगरपालिकेच्या विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
अमृत योजना – भुयारी गटारी यांमुळे नादुरुस्त झालेले रस्ते, अस्वच्छता, स्ट्रीट लाईट नसल्याने रात्री पसरणारे अंधाराचे साम्राज्य, अव्यवस्थित ओपन स्पेसेस, डासांचा उपद्रव, खड्डयामुळे वाहन चालवितांना होणारे हाल, खड्डे न बुजल्याने घडणारे किरकोळ अपघात, अतिक्रमण, अनधिकृत बांधकामे आदींबाबत नागरीकांनी जनता दरबारात गाऱ्हाणी मांडली. जनता दरबारात सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित असल्याने किरकोळ तक्रारींबाबत जागीच कार्यवाही योजण्यात आली. व्यतिरिक्त अनेकांनी लेखी स्वरुपातही तक्रारी दाखल केल्या. तक्रारी दाखल करण्यासाठी जनता दरबारातच अर्जाचे नमुने विनामुल्य उपलब्ध करुन दिलेले होते. तसेच अर्ज नमुने भरुन देण्याची सुविधाही करण्यात आलेली होती.
जनता दरबार भरविण्यासाठी महानगरपालिका प्रांगणातच टेबल खुर्च्यांसह बैठक व्यवस्था करण्यात आलेली होती. प्राप्त झालेल्या तक्रारी संबधीत विभागांकडे निर्देशित करण्यात येतील तसेच त्यांच्या निपटाऱ्यासाठी विभाग प्रमुखांना सुचना देण्यात आल्या आहेत अशी माहिती उपमहापौर सुनिल खडके यांनी दिली.
ज्या नागरीकांना आज येता आले नाही त्यांनी पुढील गुरुवारी उपस्थित राहुन आपली तक्रार मांडावी असे आवाहनही श्री. सुनिल खडके यांनी केले आहे. प्रत्येक गुरुवारी हा जनता दरबार भरविण्यात येणार आहे.








