मुंबई (वृत्तसंस्था) – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका तरुणीने बलात्काराचे आरोप केल्याने धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहेत. याप्रकरणी विरोधक वारंवार मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार योग्य निर्णय घेतील, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हंटले आहेत.

संजय राऊत म्हणाले कि, धनंजय मुंडे यांचा हा पूर्णपणे कौटुंबिक प्रश्न आहे. ते त्यातून मार्ग काढतील. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व सुजाण आणि प्रगल्भ आहे. काय निर्णय घ्यावेत आणि काही नाही याचा सर्वात जास्त अनुभव कोणाला असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचा आहे.
राजकीय विषयात आरोप-प्रत्यारोप करण्यास हरकत नाही. पण कौटुंबिक विषयात कोणीही राजकारण करु नये. ते राजकारणाचे विषय नसतात. राजकारणात एका उंचीवर, शिखरावर जाण्यासाठी खूप कष्ट, संघर्ष करावे लागतात. एका क्षणात चिखलफेक करुन संपूर्ण जीवन उद्ध्वस्त करत असतो. हे राजकीय लोकांनी आपापसात करु नये हे आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी शिकवले आहे. शरद पवारांनी सांगितले आहे, असेही संजय राऊतांनी म्हंटले आहे.
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी बुधवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सिल्वर ओकवर जाऊन भेट घेतली आहे. शरद पवार यांना भेटून धनंजय मुंडे यांनी त्यांची भूमिका पवारांसमोर मांडली. रेणू शर्मा या गायक तरुणीने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केले. तसेच पोलीस तक्रारीची कॉपीही ट्विट केली. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी मोठा खुलासा केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे.







