मुंबई (वृत्तसंस्था) – राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. बलात्काराचे आरोप आणि विरोधकांकडून होत असलेली टीका, या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक इथं धनंजय मुंडे दाखल झाले आहेत.

शरद पवार यांच्या भेटीत धनंजय मुंडे हे संपूर्ण प्रकरणाबाबत होत असलेल्या आरोपांवर स्वत:ची बाजू मांडणार आहेत. राष्ट्रवादीचे वजनदार नेते असलेल्या धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कारासारखे गंभीर आरोप झाल्याने पक्षाची प्रतिमाही मलीन होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे धनंजय मुंडे यांना आरोप प्रकरणातील पुढील भूमिकेबाबत काय सल्ला देतात, हे पाहणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
धनंजय मुंडे यांची बलात्कार प्रकरणात संपूर्ण चौकशी झाल्याशिवाय त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. त्यामुळे शरद पवार हे खरंच धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची सूचना करतात का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
‘राजकारणात आयुष्य उभं करायला आणि राजकीय स्तरावर यायला अनेक कष्ट लागतात. कोणी आरोप केल्यावर सत्यता न पडताळता लगेच निष्कर्षावर येणं योग्य नाही,’ असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे.
दुसरीकडे, भाजपचे विविध नेते मात्र या प्रकरणावरून राष्ट्रवादीवर हल्लाबोल करत आहेत. ‘धनंजय मुंडे यांनी त्वरित राजीनामा द्यावा, गुन्हा दाखल करून तपास सीबीआय कडे अथवा निवृत्त न्यायाधीश यांच्या कमिटीकडे सोपवावा. शर्मा भगिनींना संरक्षण द्यावे, दोन पेक्षा जास्त अपत्य असल्याने आणि त्याचा उल्लेख निवडणूक प्रतिज्ञापत्रात न केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द व्हावे. तसंच द्विभाऱ्या प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केले असल्यास कार्यवाही व्हावी अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा राज्यभर निषेध आंदोलने करणार,’ अशी आक्रमक भूमिका भारतीय जनता युवा मोर्चाने घेतली आहे.







