धुळे (वृत्तसंस्था) – विहिरीत पाय घसरल्याने नवविवाहितेचा मृत्यू झाला. तर, पत्नीला वाचवितांना पतीनेही प्राण गमावले बळसाणे येथे या नव दाम्पत्याचा बुडून मृत्यू झाला आहे.
रब्बी हंगाम सुरु असल्याने शेतकरी लक्ष्मण पंढरीनाथ रत्नपारखे (वय 27) हे पत्नी अंजूबाई लक्ष्मण रत्नपारखे (वय 22) यांच्या सह शेताची काम उरकत होते. यादरम्यान, पती लक्ष्मण यांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी पत्नी अंजू या विहिरीत पाणी आणण्यासाठी गेल्या. पाणी काढत असताना त्यांचा तोल गेला आणि त्या विहिरीत पडल्या. हे पहाताच लक्ष्मण यांनी पत्नी अंजूला वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली.
परंतु, विहिरीत पाण्याची पातळी जास्त असल्याने दोघेही जण तळाला गेल्याने नव दाम्पत्याचा पाण्यात बुडून दुर्दैवाने मृत्यू झाला. घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच पोलिस प्रशासनाला माहिती देण्यात आली. येथील सरपंच दरबारसिंग राजपूत यांच्यासह गावकरी आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आले.
अंजू रत्नपारखे या बळसाणे गावातील शिवरात पिण्याचे पाणीसाठी गेल्या होत्या. बळसाणे शिवारातील विहिरीत पाय घसरुन पडल्यावर पती लक्ष्मण यांनी पत्नीला वाचवण्यासाठी विहिरीत उडी घेतली. परंतु, या घटनेत दोघांचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाला.
जैताणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. चित्तम यांनी या दोघांना मृत घोषित केले. याप्रकरणी देविदास अभिमन सुर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीवरुन निजामपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास निजामपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई एस.एच. वसावे करत आहेत.