मुंबई (वृत्तसंस्था) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या पुढाकाराने मुंबईत 25 वर्षापूर्वी झालेल्या प्रसिद्ध पॉप गायक मायकेल जॅक्सनच्या कार्यक्रमाचे करमणूक शुल्क परत देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. जॅक्सन याच्या कार्यक्रमावरील करमणूक कर माफ करण्याचा निर्णय कायम ठेवण्याचे ठाकरे सरकारने निश्चित केले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज बुधवारी (दि. 6) होणाऱ्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाने करमाफीचा निर्णय घेतल्यास या कॉन्सर्टची व्यवस्थापक असणाऱ्या विझक्राफ्ट कंपनीला तिकीट विक्रीतून मिळालेली 3.36 कोटी रुपयांचे रक्कम परत मिळेल. ही रक्कम सध्या न्यायालयाच्या अखत्यारित असणाऱ्या ट्रेझरी विभागाकडे आहे.
1995 मध्ये राज्यात सेना – भाजप युतीचे सरकार सत्तेत असताना ही करमणूक शुल्क माफी वादग्रस्त ठरली होती. करमणूक कर माफ करणाऱ्या युती सरकारला उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले होते. मुंबई उच्च न्यायालयाने तो निर्णय रद्द करून पुन्हा सुनावणीचे आदेश दिले होते. मात्र आता तब्बल 25 वर्षांनंतर या निर्णयावर सुनावणी होणार आहे.

1996 साली जगप्रसिद्ध पॉप सिंगर मायकल जॅक्सनच्या शो चे भारतात विझक्राफ्ट या कंपनीने आयोजन केले होते. त्यामुळे मायकल जॅक्सन हा क्लासिकल सिंगर असल्याचे दाखवून या शोसाठी 3 कोटी 34 लाखांचा करमणूक कर माफ केला होता. या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेमुळे विझक्राफ्ट कंपनीने 3 कोटी 36 लाखांची रक्कम कर म्हणून न्यायालयात जमा केली होती. विजक्राफ्ट या कंपनीने करमणूक कर रक्कम परत करावी यासाठी राज्य सरकारकडे अर्जही केला होता. त्यामुळे 25 वर्षांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत विझक्राफ्ट कंपनीला करमणूक कराच्या रकमेत सुट मिळण्यासाठी प्रस्ताव येणार असून त्यावर योग्य निर्णय होण्याची शक्यता आहे.







