मुंबई (वृत्तसंस्था) – आपापल्या गावात जाण्यासाठी पायपीट करणाऱ्या मजूर तसंच नागरिकांना अन्नपाणी तसंच इतर मदत पुरवा, अशी सूचना केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसंच टोल ऑपरेटर आणि संबंधित यंत्रणांना केली आहे. नितीन गडकरी यांनी या संदर्भात ट्वीट केलं आहे. लॉकडाऊनमुळे खाण्यापिण्याचे हाल होत असल्याने अनेक मजूर तसंच नागरिक आपापल्या घरी पोहोचण्यासाठी शेकडो किलोमीटर पायपीट करत आहेत. लेकराबाळांसह अख्ख कुटुंब उन्हातान्हात पायपीट करुन आपल्या गावाच्या दिशेने निघाले आहेत. मात्र त्यातही त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागता आहे. लॉकडाऊनमुळे सगळंच बंद असल्याने खाण्यापिण्याचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळेच नितीन गडकरी यांनी या सगळ्यांना मदत करण्याची सूचना केली आहे. नितीन गडकरी यांनी लिहिलं आहे की, “राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसंच टोल ऑपरेटर्सना सल्ला दिला आहे आहे की, घरी पोहोचण्यासाठी पायपीट करणाऱ्या स्थलांतरित मजूर तसंच नागरिकांच्या अन्नपाण्याची व्यवस्था करा. सध्याच्या परिस्थितीत आपण या या बांधवांची मदत केली पाहिजे. मला खात्री आहे की, टोल ऑपरेटर्स या सूचनेला प्रतिसाद देतील.”