शिरसोली (प्रतिनिधी) – येथे २५ वर्षीय तरुणाने पत्राच्या राहत्या घरात छताच्या कडीला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी ४. १५ च्या सुमारास घडली आहे. सुभाष सुकलाल मराठे असे या तरुणाचे नाव आहे. गळफास घेण्याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र. न. इंदिरा नगर येथील रहिवासी सुकलाल भानुदास मराठे यांचा मुलगा सुभाष सुकलाल मराठे (वय – २५) हा आज गुरुवार दि. २४ रोजी ४. १५ वाजेच्या सुमारास घरी एकटा होता. यावेळी पत्राच्या राहत्या घरात छताच्या कडीला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सुभाषची मोठी आई केवळाबाई मराठेंच्या लक्षात आली. त्यांनी लागलीच आजू-बाजूच्या लोकांना बोलावून शिरसोली प्र. न. येथील पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांना कळविले. त्यांनी लागलीच घटनास्थळी येऊन सुभाषला खाली उतरवून जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणले असता त्याला वैद्यकीय अधिकाऱ्याने मृत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात नोंदणीचे काम सुरु आहे. सुभाष हा मिस्तरी काम करायचा. त्याच्या पश्च्यात आई,वडील,विवाहित बहीण आहे.