भुसावळ (प्रतिनिधी) – दौंड-मनमाड रेल्वे मार्गावर बुधवारी रात्री मालगाडीचे 42 पैकी 12 डबे घसरल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली असून सोलापूर रेल्वे विभागाचे व्यवस्थापक शैलेश गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे आपत्ती व्यवस्थापन टीमने लोहमार्ग दुरुस्तीचे काम युध्द पातळीवर हाती घेतली असून गुरूवारी मध्यरात्रीपर्यंत वाहतूक सुरळीत होण्याची आशा आहे. दरम्यान, या अपघातामुळे चार रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून 19 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.


बुधवारी रात्री 12 वाजून पाच मिनिटानी श्रीगोंदा रेल्वे स्टेशनपासून दोन किमी अंतरावर म्हातारपिंप्री श्रीगोंदा शिवारात सिमेंटने भरलेल्या मालगाडीचे डबे घसरल्याने या भागातील रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.
अपघाताच्या पार्श्वभूमीवर 23 रोजी सुटणार्या 02117 पुणे-अमरावती स्पेशल, 01039 कोल्हापूर-गोंदिया स्पेशल व 02016 पुणे-मुंबई स्पेशल गाडी रद्द करण्यात आली आहे तर 01040 गोंदिया-कोल्हापूर स्पेशल ही गाडी 25 डिसेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे.
अपघातांच्या पार्श्वभूमीवर एकूण 19 रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला असून त्यातील 22 रोजी सुटलेल्या सहा गाड्या
पुणे-लोणावळा-पनवेल-इगतपुरी-मनमाड मार्गे गाड्या वळविण्यात आल्या आहेत. या गाड्यांमध्ये 02779 वास्को-हजरत निजामुद्दीन स्पेशल, 01039 कोल्हापूर-गोंदिया स्पेशल, 00103 सांगोला-नरखेर किसान स्पेशल, 06229 म्हैसूर-वाराणसी स्पेशल, 06527 बेंगलुरू-हजरत निजामुद्दीन स्पेशल व 23 रोजी सुटणार्या 02149 पुणे-दानापूर स्पेशल गाडीचा समावेश आहे.
नऊ रेल्वे गाड्या मनमाड-इगतपुरी-पनवेल-लोणावळा-पुणे मार्गे वळविण्यात आल्या आहेत. त्यात 21 रोजी सुटलेली 01040 गोंदिया-कोल्हापूर स्पेशल व 02150 दानापूर-पुणे स्पेशल, 01078 जम्मूतवी-पुणे स्पेशल तसेच 02780 हजरत निजामुद्दीन-वास्को स्पेशल गाडीसह 22 रोजी सुटलेल्या 06524 हजरत निजामुद्दीन-येसवंतपूर स्पेश, 06501 अहमदाबाद-यशवंतपूर स्पेशल व 02224 अजनी-पुणे स्पेशल, 02150 दानापूर-पुणे स्पेशल तसेच 23 रोजी सुटणार्या 01040 गोंदिया-कोल्हापूर स्पेशल एक्स्प्रेसचा समावेश आहे.
23 रोजी सुटलेली 02136 मंडुआडीह-पुणे स्पेशल एक्स्प्रेसजळगाव-सूरत-वसई रोड-पनवेल-लोणावळामार्गे वळवण्यात आली तर 23 रोजी सुटलेली 01033 पुणे-दरभंगा स्पेशल दौंड-कुर्डूवाडी-लातूर रोड-पिंपळखुटी-नागपूरमार्गे वळवण्यात आली. 23 रोजी सुटलेली 01077 पुणे-जम्मू तवी गाडी पुणे-कर्जत-पनवेल-वसई रोड-रतलाम-कोटा-मथुरा जंक्शनमार्गे वळवण्यात आली. 22 रोजी निघालेली 06528- हजरत निजामुद्दीन-बेंगलुरू स्पीकल गाडी खंडवा-अंकई-पूर्णा-परभणी लातूर रोड-कुर्डूवाडी-वाडीमार्गे वळवण्यात आली. दरम्यान, रेल्वे प्रवाशांनी अधिक माहितीसाठी 139 वर संपर्क साधावा, असे कळवण्यात आले आहे.







