अमळनेर (प्रतिनिधी) – प्रताप महाविद्यालय अमळनेर येथे रुसा अंतर्गत आयोजित राज्यस्तरीय वेबिनारसाठी राज्यभरातून दहा हजार जणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या ऑनलाईन राज्यस्तरीय वेबिनारचा विषय “गणित म्हणजे काय?” असा होता व त्याचे व्याख्याते अच्युत गोडबोले होते. गणिताचा अभ्यास करतांना फक्त सूत्र पाठ करणे महत्त्वाचे नाही तर “तर्कबुद्दी” आणि “विचारक्षमता” वाढविणे, मनात रुजविणे महत्त्वाचे असा संदेश गणित प्रेमींपर्यंत पोहचविण्याचे कार्य राष्ट्रीय गणित दिनानिमित्त प्रताप महाविद्यालयाव्दारे आयोजित “गणित म्हणजे काय?” या राज्यस्तरीय वेबिनारव्दारे जगविख्यात प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केले.


वेबिनार मध्ये राज्यभरातून दहा हजाराहून अधिक गणित प्रेमींनी सहभाग नोंदविला. अमळनेर हे त्यांचे आजोळ असल्याने येथे माझे नाते घट्ट असल्याचे सांगत गणितातील गमती-जमती, गुंतागुंतीची समीकरणे यामुळेच “गणिती” पुस्तक लिहिण्याचा निर्णय घेतला असे सांगितले व गणिताचा संपूर्ण इतिहासपट देखील उलगडला.
गणितातली काही क्लिष्ट उदाहरण त्यांनी मराठीत अगदी सोप्या भाषेत सांगितली श्रीनिवास रामानुजन यांच्या काही गमती-जमती व त्यांनी केलेलं काम याचा संक्षिप्त आढावा घेतला. गणिताच्या इतिहासातील अनेक गणितज्ञांचे रंजक दाखले देत अगदी सोप्या भाषेत पावर पॉईंट सादरीकरणातून व्याख्यान दिले.
गणित हे रंजक पद्धतीने कसं शिकावं व शिकवावं हे त्यांनी प्रश्नांची उत्तरे देताना सांगितलं.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आयोजक महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ. ज्योती राणे यांनी भूषविले तर प्रस्तावित व सूत्रसंचालन गणित विभाग प्रमुख प्रा. डॉ. नलिनी पाटील यांनी केले. तांत्रिक बाबी व इतर जबाबदारी प्रा. रोहन गायकवाड यांनी सांभाळली. आभार प्रदर्शन प्रा. डॉ. रुपेश मोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणित विभागातील सर्व सहकाऱ्याने परिश्रम घेतले.







