पुणे (वृत्तसंस्था) – पुण्यातील दोन विद्यार्थिनींनी सहा नवीन लघुग्रहांचा शोध लावण्यात यश मिळवले. त्यांनी डॉ. अब्दुल कलाम अवकाश संशोधन संस्थेत एका उपक्रमात सहभाग घेत हे यश मिळवले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

सूर्यमालेतील महत्वाचा घटक असलेल्या लघुग्रहांबद्दल सातत्याने संशोधकांकडून अभ्यास केला जातो. यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. अशाच उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी 27 नवीन लघुग्रहांचा शोध लावला आहे. त्यात यामध्ये पुण्यातील विखे पाटील शाळेतील आर्या पुलाटे आणि श्रेया वाघमारे या दोघींनी मंगळ आणि गुरूच्या कक्षेतील सहा नवीन लघुग्रहांचा शोध लावला आहे.
कलाम सेंटर आणि आंतरराष्ट्रीय लघुग्रह शोधिका सहयोग (आयएएससी) यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय स्तरावरील लघुग्रह शोध मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत जगभरातून 22 स्पर्धक सहभागी झाले होते. जगभरात 9 नोव्हेंबर ते तीन डिसेंबर दरम्यान आयोजित विविध उपक्रमांच्या माध्यमातून, अतिशय खडतर निवड प्रक्रियेद्ववारे ही निवड केली होती. यानंतर त्यांना लघुग्रह शोध मोहिमेबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
या लघुग्रहांचा शोधप्रक्रिया ही प्राथमिक स्तरावर असून, यासंदर्भात अधिक माहिती आणि अभ्यासानंतर त्यांना लघुग्रहाचा दर्जा दिला जाईल. माइनर प्लॅनेट सेंटर, इंटरनॅशनल ऍस्ट्रॉनॉमिकल युनियनतर्फे हा दर्जा देण्यात येतो. यासाठी आणखी पाच वर्षांचा कालावधी लागेल, अशी माहिती आयोजकांतर्फे देण्यात आली.
अवकाशातील फिरत्या खडकांचा म्हणजेच लघुग्रहांचा अभ्याचा अभ्यास करणे, त्यांचे निरीक्षण करणे हा अंतराळ संदर्भातील अभ्यासाचा एक महत्वाचा भाग आहे. श्रीजन पाल, डॉ. कलाम सेंटरचे संस्थापक







