मुंबई (वृत्तसंस्था) – बोरिवली पूर्व येथे मागाठाणे विधानसभा मतदारसंघात विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या पुढाकाराने भाजीपाला घरपोच पोहचविण्याच्या अभियानाला आजपासून प्रारंभ करण्यात आला. बोरिवली पूर्व येथील फुलपाखरु उद्यान टाटा पॉवर हाऊस येथील सभागृहात मार्केटमधून आलेल्या भाजीपाल्याची साठवण होते. तेथून छोट्या टेम्पोच्या माध्यमातून वॉर्डा- वॉर्डामध्ये पाच कार्यकर्ते भाजीपाला पोहचवितात. तेथून परिसरातील कार्यकर्त्यांची टीम प्रत्येकी १० ते २५ घरापर्यंत भाजीपाला पोहचविण्याचे कुठेही गर्दी न करता एकटेच पोहचवित आहेत. आज वॉर्ड क्र.4, वॉर्ड क्र.5, वॉर्ड क्र.11 या वॉर्डामधील नागरिकांना भाजीपाला पोहचविण्यात आला. तर आज रात्री येणा-या ट्रकमधून येणारा भाजीपाला उदया सकाळी उर्वरित वॉर्ड क्र.3, वॉर्ड क्र.12, वॉर्ड क्र.25, वॉर्ड क्र.26, या वॉर्डामधील नागिरकांना वितरित करण्यात येणार आहे. अशा पध्दतीने कुठेही गर्दी न करता मागठाणे विधानसभा मतदारसंघात भाजीपाला पुरविण्याची साखळी विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर स्वयंसेवी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तयार केली आहे.