भुसावळ (प्रतिनिधी) – मायबाप जोपर्यंत ते घरात आहेत तोपर्यंत घराला घरपण आहे. ओसरी उजाड झाली की त्यांचं खरं मोल कळते. जिवंतपणीच आई-वडिलांच्या कष्टाचं मोल जपायला हवं. त्यांच्यावर लिहिल्या गेलेल्या ओव्या, कविता संकट काळात लढण्याचं बळ देतात, असे मत कवी देवा झिंजाड यांनी व्यक्त केले.

भुसावळच्या अंतर्नाद प्रतिष्ठानने स्वर्गीय पुष्पा वसंतराव पाटील यांच्या स्मरणार्थ तीन दिवसीय पुष्पांजली ऑनलाइन प्रबोधनमाला आयोजित केली आहे. त्यात मंगळवारी मायबापाच्या कविता या विषयावर प्रथम पुष्प गुंफताना ते बोलत होते.
कवी म. भा. चव्हाण यांच्या ‘आई उन्हाची सावली आई सुखाचे नगर, निळ्या आकाशाऐवढा तिच्या मायेचा पदर’ आणि कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या ‘देरे देरे योग्या ध्यान. एक मी काय सांगते, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते ‘ या कवितांनी त्यांनी व्याख्यानाला सुरुवात केली. योगेश इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. पुष्पांजली प्रबोधनमालेचं यंदाचं तृतीय वर्ष आहे.







