नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोना व्हायरसने इटली आणि स्पेनमध्ये थैमान घातल्यानंतर आता अमेरिकेत शिरकावर केला आहे. अमेरिकेत कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. अमेरिकेत गेल्या 24 तासांमध्ये कोरोनामुळे 345 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 18000 नवीन कोरोना रुग्ण समोर आले आहेत. यानुसार आता अमेरिकेत प्रत्येक मिनिटाला जवळपास 13 लोकांना कोरोनाची लागण होत आहे.
यासोबतच आता अमेरिकेत कोरोना रुग्णांनी एक लाखांचा आकडा ओलांडला आहे. अमेरिकेने आता चीन, इटली आणि स्पेनलाही मागे टाकले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार अमेरिकेतमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 18000 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर या 24 तासांमध्ये 345 लोकांचा बळी गेला आहे. जॉन हॉपकिंस यूनिव्हर्सिटीनुसार आता अमेरिकेत जगभरातील सर्वात जास्त कोरोना रुग्ण आहेत. यानुसार अमेरिकेमध्ये सध्याच्या घडीला 1,04,007 कोरोना रुग्ण आहेत. तर येथे आतापर्यंत 1693 लोकांचा मृत्यू झाला आहे. आता अमेरिकेत सर्वात जास्त कोरोना रुग्ण आहेत. अमेरिकेत आता इटलीपेक्षा 15000 आणि चीनपेक्षा 20000 हजार जास्त रुग्ण आहेत. दरम्यान अमेरिकेत इटलीपेक्षा मृत्यूदर कमी आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क हे शहर कोरोना व्हायरसचे केंद्र बनले आहे. येथे कोरोना रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. एका आकडेवारीनुसार अमेरिकेतील अर्ध्यापेक्षा जास्त रुग्ण हे न्यूयॉर्क शहरातील आहेत. न्यूयॉर्कमध्ये आतापर्यंत 500 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.