लातूर (वृत्तसंथा) – नवऱ्याच्या एक कोटीची विमा पॉलिसीची रक्कम मिळवण्यासाठी बायकोने चक्क नवऱ्याचा खून केला असल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यात घडली आहे. दरम्यान पोलिसांना (police) एखाद्या गुन्ह्याबद्दलची किरकोळ शंकासुद्धा गुन्हा उघडकीस आणण्यास मदत ठरू शकते. हे या गुन्ह्यात दिसून आले आहे. दरम्यान तब्बल ८ वर्षांनी हा गुन्हा उघडकीस आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
निलंगा तालुक्यातील निटूर या गावातील रहिवाशी आण्णाराव बनसोडे यांचा २०१२ ला अपघाती मृत्यू झाला होता. तशी अपघाती नोंद देखील करण्यात आली होती. मात्र, तब्बल ८ वर्षांनी या घटनेला वेगळे वळण लागले आहे. आण्णाराव यांनी २०१० मध्ये १ कोटी रुपयांचा अपघाती विमा उतरवला होता. त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांची बायको नॉमिनी होती. अण्णाराव यांच्या मृत्यूनंतर कायदेशीर वारसदार ज्योती यांनी विमा कंपनीकडे १ कोटी रुपयाचा क्लेम दाखल केला होता.
दरम्यान, अण्णाराव यांच्या पत्नीने दाखल केलेल्या क्लेममधील काही माहिती विपर्यस्त होती, शिवाय व्यवसायाने फर्निचर बनवणारे आण्णाराव १ कोटीचा अपघात विमा का उतरवतील? अशी शंका देखील विमा कंपनीला आली. त्यांनी या प्रकाराची चौकशी औसा येथील पोलिस स्टेशनमध्ये केली आणि कंपनीला आलेली शंका पोलिस निरीक्षकांपर्यंत पोहोचवण्यात आली. पोलिसांनाही सदर घटनेत झोलझाल वाटल्याने त्यांनीही बंद झालेली फाईल उघडून चौकशीला सुरुवात केली आणि धक्काददायक माहिती समोर आली.