नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – राज्यात कोरोना संकटाचे ढग गडद होत आहेत. त्यामुळे संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांवर वेगळेच संकट ओढवले आहे. कोरोनामुळे रोजंदारी करणाऱ्या हजारो लोकांनी पायीच घरचा रस्ता धरल्याचे आपण पाहिले आहे. पण अमरावतीतल्या २५ कुटुंबांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाची भीती नाही साहेब, पण आम्ही भुकेनेच मरु असे सांगितले. अमरावतीमधील तिवसा शहरातील पंचवटी चौकात २५ वर्षांपासून आदिवासी २५ कुटुंबं पाल टाकून राहत आहेत. हातावर पोट असणारे हे लोक असून कोणी गॅस आणि स्टो दुरुस्ती करुन, कोणी भांडी विकून, टोपल्या विकून उदरनिर्वाह चालवतात. पण २२ मार्चपासून राज्यातल्या संचारबंदीमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आम्ही आरोग्याची काळजी करायची की दोनवेळचे जेवण कसे मिळणार याचा विचार करायचा, असा प्रश्न या आदिवासी कुटुंबांपुढे आहे. त्यामुळे या गरजूपर्यंत अन्न-धान्य कसं पोहोचेल, हे पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.