ठेकेदार अधिकार्यांकडून व्याजासहीत होणार रक्कम वसूल ; त्वरीत विभागी चौकशी प्रस्तावीत करण्याचे जिल्हाधिकार्यांनी दिले आदेश

जळगाव (प्रतिनिधी) – अवैध गौणखनिज वाहतुकीसाठी बोगस पावंत्याचा वापर होत असल्याची तक्रार जि.प.सदस्या पल्लवी सावकारे यांनी केली होती. याप्रकरणी सुनावणी घेण्यात आली असून या सुनावणीत सदर तक्रारीत तथ्य आढळून आले आहेत.त्यामुळे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना संबधितावर कारवाई करून त्यांच्याकडून दंड व व्याजासहीत रक्कम वसूल करावी असे आदेश दिले असल्याची माहिती सावकारे यांनी दिली आहे.
जिल्हा परिषद मालकीच्या पाझर तलावातून अवैधरित्या गौणखनिज वाहतूक करण्यासाठी महसूल विभागाच्या नावे असलेल्या बनावट वाळूच्या पावत्या बनवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल
करण्याची मागणी कुर्हा-वराडसीम गटाच्या जिल्हा परिषद सदस्या पल्लवी प्रमोद सावकारे यांनी केली होती.
याप्रकरणी सावकारे यांच्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी यांच्याकडे सुनावणी घेण्यात आली. यावेळी सुनावणीत गौणखनीजाबाबत झालेला गैरप्रकाराविषयी वाळूच्या वाहतूक परवान्यांची महामायनींग प्रणालीवर तपासणी केली असता पावत्या अवैध आढळून आले आहेत. भडगाव, पाचोरा व जळगाव या तीन तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस पावत्यांचा वापर झाल्याचे दिसून आल्यामुळे सदरील गैरप्रकार प्रकरणी संबधीत ठेकेदार अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून दंड व व्याजासहीत रक्कम वसूल करून संबधीतांवर कारवाई करण्यात यावी व त्वरीत विभागीय चौकशी प्रस्तावीत करावे असे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्हा परीषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत.







