जळगाव (प्रतिनिधी) – येथील सावदा नगरपरिषदेतील नगरसेवक राजेंद्र श्रीकांत चौधरी यांनी २००६ ते २०११ या कालखंडात पत्नी नगराध्यक्षा असताना पदाचा दुरुपयोग करीत वाढीव घरपट्टी लागू असताना ही स्वतःसाठी मात्र कमी घरपट्टी लागू केली आणि नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान केले. म्हणून त्यांच्याविरुद्ध अपात्रतेचा अर्ज जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केला होता. या अर्जावर आज सोमवारी ७ डिसेंबर रोजी आदेश देण्यात आला, असून तक्रारदार यांचा अर्ज मंजूर करून यातील सावदा येथील नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचे सिद्ध झाल्याने त्यांना नगरसेवक या पदावरून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी अपात्र घोषित केले आहे. याबाबतचा आदेश आज पारित करण्यात आला आहे.


तसेच सविस्तर वृत्त असे कि,अजय भागवत भारंबे रा.सावदा यांनी याबाबत जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीनुसार दोन्ही बाजूंचे म्हणणे जिल्हाधिकार्यांनी ऐकून घेतले होते. त्यानुसार आज सोमवारी त्यांनी अंतिम निर्णय जाहीर केला. त्यांनी दिलेल्या निकालात म्हटले आहे की, तक्रारदाराने केलेल्या तक्रारीत पत्नी नगराध्यक्षा असताना स्वतःचे आर्थिक हितसंबंध जोपासण्याचा आरोप सत्य असल्याचा निष्कर्ष निघत आहे. सर्व नागरिकांना वाढीव घरपट्टी लागू केलेली असताना नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी पत्नी नगराध्यक्षा असतांना व स्वतः नगरसेवक असतांना पदाचा दुरुपयोग करून स्वतःसाठी कमी घरपट्टी लागू केली. जुन्या दराप्रमाणे त्यांनी स्वतःच्या घरासाठी घरपट्टीचे जुने दर लावले असे तक्रारीत नमूद आहे. आजपावेतो जुन्याच दराने घरपट्टी भरत आहे.
त्यानुसार नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी त्यांच्या खुलासा मध्ये सांगितले होते की, दहा वर्षांपूर्वीची ही गोष्ट असून यात कुठलेही तथ्य नाही. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर निकाल दिला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.







