मुंबई : नव्या कृषी कायद्याला विरोध करीत शेतकरी संघटनांच्या वतीने उद्या 8 डिसेंबरला ‘भारत बंद’ पुकारण्यात आला आहे. गेल्या 12 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. दरम्यान या बंदला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे. सोबतच अनेक कलाकार, साहित्यिक तसेच खेळाडूंनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आता या दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील अनेक बाजार समित्यांनी उद्या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचं सांगितलं आहे.धुळे : उद्याच्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर धुळे, साक्री, पिंपळनेर बाजार समिती बंद राहणार आहे. उद्याच्या भारत बंद मध्ये हमाल मापाडी माथाडी युनियन , महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ पुणे व महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघ,पुणे संपात सहभागी होणार असल्यामुळे धुळे जिल्ह्यातील धुळे, साक्री , पिंपळनेर बाजार समितीचे सर्व कामकाज बंद राहणार आहे. तर शिरपूर, दोंडाईचा, शिंदखेडा बाजार समिती बंद ठेवायची का सुरु ठेवायची याबाबत व्यवस्थापनाची आज बैठक होऊन त्यात निर्णय होणार आहे.