प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी 10 डिसेंबर रोजी आढावा : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे
नाशिक (वृत्तसंथा) – विभागातील सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न पारदर्शक पध्दतीने व लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी विभागस्तरावर मुख्यमंत्री सचिवालयाची स्थापना करण्यात आली आहे. त्यानुषंगाने नाशिक विभागात आजपर्यंत मुख्यमंत्री सचिवालय कक्षामार्फत 594 अर्ज निकाली काढण्यात आले आहे. क्षेत्रीय स्तरावरील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी 10 डिसेंबर 2020 रोजी संबंधित कार्यालयांच्या प्रमुखांचे आढावा घेण्यात येणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी एका शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये दिली.
सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक विभागस्तरावर मुख्यमंत्री सचिवालय स्थापन करण्याच्या सूचना दिल्या होत्या . त्यानुषंगाने जानेवारीमध्ये या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाकडे नोव्हेंबरपर्यंत शासन स्तरावरील 257 आणि क्षेत्रीय स्तरावरील 761 असे एकूण 1 हजार 18 प्रकरणे सादर झाली होती. त्यामध्ये 594 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे. तसेच प्रलंबित 424 तक्रारी क्षेत्रीय स्तरावरील संबंधित विभागाकडे प्रलंबित असून या प्रकरणांवर लवकरच कार्यवाही करुन ते ही निकाली काढण्यात येणार असल्याचे श्री. गमे यांनी सांगितले.
या कक्षाद्वारे विभागीय स्तरावरील मुख्यमंत्री सचिवालय कक्षातर्फे जनतेकडून मुख्यमंत्री महोदयांना उद्देशून लिहिलेले अर्ज, निवेदने, संदर्भ स्विकारले जातात. शासन स्तरावरुन कार्यवाही होणे आवश्यक असलेल्या महत्वाच्या प्रकरणांशी संबंधित अर्ज किंवा निवेदने मुख्यमंत्री सचिवालयाच्या प्रधान सचिवांकडे सादर करण्यात येत असल्याचेही विभागीय आयुक्त श्री.गमे यांनी सांगितले.
अर्जदारांनी मानले शासनाचे आभार
नोव्हेंबर 2020 अखेर 1 हजार 18 अर्जांपैकी 594 तक्रार निकाली आहेत. आपल्या तक्रारीची शासनाने दखल घेवून त्यावर कार्यवाही केल्याने तक्रार केलेल्या अर्जदारांनी शासनाचे भ्रमणध्वनी वरुन व प्रत्यक्ष कार्यालयात येवून शासनाचे आभार मानून समाधान व्यक्त केली असल्याची माहिती विभागीय आयुक्त श्री.गमे यांनी दिली आहे.







