मुंबई (वृत्तसंस्था) – खासगी डॉक्टरांनी आपापले दवाखाने बंद ठेवून नियमित रुग्णांची गैरसोय करु नये, असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. खासगी डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने सुरु ठेवणं गरजेचं आहे. अशा प्रसंगात असंवेदनशीलता दाखवू नका, असंही टोपे म्हणाले. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. खासगी डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवल्याबाबत राजेश टोपे म्हणाले की, “कोरोनाव्यतिरिक्त इतर आजारांचे रुग्ण त्यांच्याकडे उपचारासाठी येतात. त्यात वयोवृद्ध, महिला, मुले असतात त्यांची गैरसोय होऊ नये. त्यामुळे त्यांनी अशा परिस्थितीत असंवेदनशीलता न दाखवता दवाखाने सुरु ठेवावेत.”
दरम्यान, सरकार लवकरच अत्यावश्यक सेवेतील सर्वांना ओळखपत्र देत आहोत. त्यात डॉक्टर, त्यांच्याकडील कर्मचारी या सगळ्यांचा समावेश असेल. तसंच शासकीय आरोग्य सेवेतील डॉक्टर, कर्मचारी वर्ग तसेच अन्य आपात्कालीन सेवेतील कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहेत. सेवा देत आहेत. त्यांचे अभिनंदन आणि आभार मानतो. अशी सेवा देणाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता देण्याबाबत राज्य सरकार विचार करत असल्याचं राजेश टोपे म्हणाले.
राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा आहे. सात ते आठ दिवस पुरेल एवढाच रक्तसंचय आहे. रक्ताची साठवणूक दीर्घकाळ करता येत नाही. केवळ कोरोनाच्या रुग्णांसाठी नव्हे तर अनेक वैद्यकीय उपचारांमध्ये, हिमोफेलीयाच्या रुग्णांसाठी रक्ताची गरज असते. अशावेळी सामाजिक संस्थांनी संचारबंदीकाळातील सूचनांचे पालन करुन रक्तदान शिबिरं घ्यावीत. जिल्हा प्रशासनाने त्यांना सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रक्तदान शिबीरे घेताना सोशल डिस्टन्सिंग पाळावं, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं. राज्यात सध्या 135 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. आतापर्यंत 4228 जणांच्या कोरोनासाठी चाचण्या केल्या त्यापैकी 4017 चाचण्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर 19 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. कोरोना आजार बरा होतोय हे आशादायी चित्र आहे, असं राजेश टोपे यांनी सांगितलं. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्य शासन सध्या ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या ‘3 टी’वर भर दिला जात आहे. कोरोनाबाधित रुग्णांपासून जवळच्या व्यक्तींना संसर्ग होण्याचा धोका लक्षात घेऊन, राज्य सरकार सध्या अशा व्यक्तींचे ट्रेसिंगनंतर त्यांची टेस्टिंग आणि ट्रीटमेंट म्हणजेच शोध, तपासणी आणि उपचार या त्रिसूत्रीप्रमाणे काम करण्यात येत आहे.