वादग्रस्त विवेक काटदरे अखेर पायउतार; बोरसेंचीही झाली गच्छंती
जळगाव (प्रतिनिधी) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वित्त व लेखा अधिकारी पदाचा प्रभारी पदभार सोमनाथ गोहिल यांनी शुक्रवारी ४ डिसेंबर रोजी स्वीकारला. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.पी.पाटील, कुलसचिव डॉ. बी.व्ही.पवार, कायदा अधिकारी डॉ.एस.आर.भादलीकर यांच्यासह वित्त व लेखाधिकारी विभागातील विविध अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
नियमित वित्त व लेखा अधिकारी भागवत कऱ्हाड यांची अमरावती विद्यापीठामध्ये नियुक्ती झाल्यानंतर प्रभारी वित्त व लेखा अधिकारी म्हणून सोमनाथ गोहिल यांच्याकडे पदभार देण्यात आला होता. मात्र वर्षभरापूर्वी विवेक काटदरे यांच्याकडे हा भार देण्यात आला. त्यांच्याकडे भार दिल्यानंतर सातत्याने विद्यापीठाच्या प्रशासनावर टीका होत होती. पंडित दीनदयाल उपाध्याय अध्यासनावर देखील काटदरे आहेत. तसेच कुठल्याही नियमात न बसवता काटदरे यांना नियमबाह्य नियुक्ती दिली गेली असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस तसेच विविध पक्षांतर्फे आणि सिनेट सदस्यातर्फे करण्यात आला होता. त्यामुळे वित्त व लेखा अधिकारी पदावरून विद्यापीठाच्या प्रशासनावर ताशेरे ओढले जात होते.
विवेक काटदरे यांची केलेली नियुक्ती नियमबाह्य असून त्यांना दिला जाणाऱ्या पगाराची देखील वसुली व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ४ डिसेंबर रोजी विवेक काटदरे यांच्याकडून पदभार काढून घेण्यात आला आहे. बुधवारी उप वित्त लेखाधिकारी सोमनाथ गोहिल यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला आहे. त्याचबरोबर विशेष कार्य अधिकारी असे पद असणारे माजी परीक्षा नियंत्रक अमूल बोरसे यांची देखील नियुक्ती नियमबाह्य असल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह इतर सदस्यांनी नाराजी व्यक्त केले होती. अमूल बोरसे यांना पदावरून तात्काळ काढावे, त्यांच्यावर विद्यापीठाने केलेला खर्च सर्व संबंधितांकडून वसूल करण्यात यावा अशी मागणी आजही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ॲड. कुणाल पवार यांनी केली आहे.
त्यानुसार अमुल बोरसे यांची देखील पंधरा दिवसांपूर्वी विद्यापीठाने घरवापसी केली असून त्यांनाही विशेष कार्य अधिकारी पदावरून बाजूला केले असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत अड. कुणाल पवार म्हणाले की, अमुल बोरसे आणि विवेक काटदरे यांच्याविषयी आपण तक्रारी गेल्या होत्या. त्याबाबत आता पाठपुराव्याला यश आले असून दोघांची विद्यापीठाने हकालपट्टी केली असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले. दरम्यान, बोरसे व काटदरे यांच्या हकालपट्टीचे अधिसभा सदस्य विष्णू भंगाळे यांनीही स्वागत केले असून विद्यापीठाच्या गैरकारभारावर लगाम लागला पाहिजे, असे सांगितले.







