चंद्रपूर (वृत्तसंस्था) – ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारीसाठी येत असलेल्या पर्यटकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. यात एका 12 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. सध्या सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सना अग्रवाल असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी 10.30 च्या सुमारास चिमूर तालुक्यातील कोलारा प्रवेशद्वाराकडून एक वाहन पर्यटकांना घेऊन ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सफारीसाठी येत होती. त्यावेळी मासळ गावाजवळ भडगा नाल्यात या पर्यटकांचे वाहन कोसळले. यामुळे गाडीतील सर्वच प्रवाशांना गंभीर दुखापत झाली.
यात अपघातात एका 12 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पाच जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना आसपासच्या नागरिकांनी रुग्णालयात रवाना केले आहे. तसेच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचत तपासकार्य सुरु केले आहेत. दरम्यान अपघातग्रस्त झालेले वाहन हे नागपूर येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.







