प्याँगयांग (वृत्तसंस्था) – ‘कोरोना विषाणू’च्या संसर्गाला चीनमध्ये सुरुवात होऊन वर्ष उलटलं, मात्र जगभरातील सर्वच देश लशीची प्रतीक्षा करत आहेत. परंतु उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन याने सहकुटुंब कोव्हिड लस घेतल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे चीननेच ही लस किम जोंग उनला पुरवल्याचंही बोललं जातं.

अमेरिकेतील तज्ज्ञांनी जपानच्या दोन गुप्तचर स्रोतांच्या हवाल्या ने हा दावा केला आहे. त्यानुसार चीनने किम जोंग आणि त्याच्या कुटुंबियांना प्रायोगिक तत्त्वावर ही लस दिली आहे. वॉशिंग्टनस्थित ‘सेंटर फॉर नॅशनल इंटरेस्ट’मधील उत्तर कोरिया विषयाचे तज्ज्ञ हॅरी कॅजियानिस यांच्या मते किम जोंग आणि त्याच्या जवळच्या अधिकाऱ्यांना आधी लस देण्यात आली. ही लस कोणत्या कंपनीने दिली आहे हे अद्याप समजू शकले नाही. ’19fortyfive.com’ या ऑनलाइन पोर्टलनुसार सुमारे दोन किंवा तीन आठवड्यांपूर्वी ही लस दिली गेली आहे.
अमेरिकन शास्त्रज्ञ पीटर जे होजे म्हणाले की चीनमधील किमान तीन कंपन्या कोरोना विषाणूची लस तयार करत आहेत. यामध्ये सिनोवेक बायोटेक लिमिटेड, कॅन्सिनो बायो आणि सिनोफार्म ग्रुप या कंपन्यांचा समावेश आहे. सिनोफार्म कंपनीचे म्हणणे आहे की त्यांनी हे औषध किमान 10 लाख जणांना दिले आहे. परंतु अद्याप कोणत्याही चीनी कंपनीने आपल्या प्रायोगिक औषधाच्या तिसऱ्या टप्प्याविषयी माहिती सार्वजनिक केली नाही.
दुसरीकडे, उत्तर कोरियाने अद्याप आपल्या देशातील कोरोना विषाणू केसेसची माहिती जाहीर केलेली नाही. मात्र चीनसोबत त्यांची मैत्री पाहता कोरोना विषाणूचा संसर्ग उत्तर कोरियामध्ये पसरणार नाही, असं शक्य नसल्याचं दक्षिण कोरियाचे म्हणणं आहे.
उत्तर कोरियाच्या हॅकिंग ग्रुपने अनेक देशांमध्ये लसी बनवणार्या कंपन्यांची माहिती लीक करण्याचा प्रयत्न केला, असेही वृत्त अलिकडे समोर आले होते. अॅस्ट्राझेनेका या ब्रिटिश कंपनीवरही सायबर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचा उल्लेख मीडिया रिपोर्टमध्ये आहे.







