झेंडूच्या फुलांना फुकटही कोणी घेईना

जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील शिरसोली येथील फुलांच्या शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे सध्या वाईट हाल सुरू आहे. शेतामध्ये पिकवलेली झेंडूची फुले अक्षरश: मातीमोल भाव मिळत असल्यामुळे काही शेतकऱ्यांनी शेतामध्ये रोटर फिरवून पूर्ण काढून टाकले आहे. त्यामुळे झेंडूच्या फुलांना भाव नसल्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात येत आहे.

शिरसोली येथील शेतकरी शांताराम रामदास काटोले, अशोक रामकृष्ण बुंधे, गोपाल काटोले, रामकृष्ण काटोले आदी शेतकऱ्यांनी त्यांची व्यथा ‘केसरीराज’कडे मांडली आहे. त्यांनी सांगितले की, भाव नसल्यामुळे आणि फुकट देखील कोणी घेत नसल्यामुळे झेंडूच्या शेतामध्ये रोटर फिरवून काढून टाकण्याची वेळ आमच्यावर आली आहे. तसेच भाव नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने शेतकऱ्याची मदत करावी, त्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी या शेतकऱ्यांसह ग्रामस्थांची मागणी आहे.
शिरसोली हे गाव फुलांसाठी प्रसिद्ध आहे. येथे झेंडू, गुलाब, निशिगंधा तसेच अनेक प्रकारचे पंचवीस ते तीस प्रजातीची फुलांची शेती केली जाते. येथील फुले ही जिल्ह्यासह पूर्ण महाराष्ट्रात तसेच इतर राज्यात देखील निर्यात केली जातात. येथील फुलांना खूप मागणी असते. मात्र आता दिवाळी सरल्यानंतर या झेंडूच्या फुलांना कोणीही मागणी देत नसून शेतकरी हवालदिल झाले आहेत.







