पोलीस निरीक्षकांना राष्ट्रवादी पक्षाचे निवेदन

जामनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील सामरोद येथे उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करून अवैध धंदेवाल्यांवर कारवाई केली. दरम्यान या कारवाईची तक्रार का केली म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना धमक्या येत आहेत. याबाबतचे निवेदन जामनेर पोलीस निरीक्षकांना पक्षातर्फे देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने अवैध धंदेवाल्यांविरूद्ध मोहीम सुरु केली आहे. त्याचाच भाग म्हणून सामरोद येथे कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीनुसार कारवाई झाली. मात्र आता तेथील काही अवैध व्यावसायिकांनी कार्यकर्त्यांना धमकावणे सुरु केले आहे. त्यामुळे जामनेर तालुक्यात विविध ठिकाणी सुरु असलेल्या अवैध व्यवसायांना आळा घालावा अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील, डॉ. प्रशांत पाटील, नरेंद्र जंजाळ, जीनेश पाटील, अनिल कुमार बोहरा, विशाल एस. पाटील, विनोद माळी आदींच्या सह्या आहेत.







