हिंतसंबंधित व्यक्तींनी चौकशी दडपण्याचा केला प्रयत्न ; जळगावात पत्रकार परिषदेत दिली माहिती
जळगाव ( प्रतिनिधी) – भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेची 9 राज्यात शाखा असुन यात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून 1100 कोटींची मालमत्ता मातीमोल भावात विकली गेली असल्याचा गौप्यस्फोट माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज जळगावात पत्रकार परिषदेत केला.
यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की, यात काही हिंतसंबंधित व्यक्तींनी चौकशी दडपण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
2018 सालापासून अँड.कीर्ती पाटील यांच्यामार्फत आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करीत आहोत या प्रकरणांमध्ये ठेवीदारांना न्याय मिळावा अशी प्रामाणिक भूमिका घेऊन अँड. किर्ती पाटील यांनी दिल्ली मुंबई या दोन्ही ठिकाणी मंत्र्यांच्या गाठीभेटी घेतल्या दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री राधा मोहन सिंग त्यांच्यानंतर आलेले नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे वारंवार भेटी घेऊन तसेच कागदपत्र देऊन या प्रकरणी चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी खासदार रक्षा खडसे तत्कालीन आमदार एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू ठेवला होता.
त्याचबरोबर 2018 – 19 साली राज्य सरकारच्या काळांमध्ये तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे देखील वारंवार याप्रकरणी सक्षम यंत्रणेमार्फत चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र माझ्यावर दबाव आहे,असे ही खडसे सांगितले.
माझ्यावर राजकीय दबाव आहेत. त्यामुळे मी यामध्ये जास्त काही करू शकत नाही. त्या वेळी सुभाष देशमुख यांच्याशी शाब्दिक चकमक उडाल्याची खडसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी खडसे यांनी पत्रकार परिषदेत पुढे सांगितले की, पतसंस्थेचा घोटाळा हा खूप मोठा असून यामध्ये विविध क्षेत्रातील मंडळी यांचे हितसंबंध असून त्यांची नावे पुढील तपासामध्ये येणार आहेत. तपासामध्ये अडथळा ठरू नये म्हणून मी जास्त यामध्ये बोलणार नाही, तपासामध्ये सर्व बाबी येतील. याबाबतचा पुढील पाठपुरावा अँड.कीर्ती पाटील यांच्यामार्फत आम्ही सुरू ठेवलेला आहे. दोन ट्रक भर पुरावे जळगावातून नेल्यामुळे याच्या चौकशीला दोन ते तीन महिने लागू शकतात. त्याचबरोबर या घोटाळ्यांमध्ये अकराशे कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा प्राथमिक अंदाज असून जे ठेवीदार हतबल झाले, जे ठेवीदारांनी आत्महत्या केल्या किंवा अकस्मात मरण पावले अशा सर्व ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी अँड.कीर्ती पाटील या प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या पाठीशी मी आहे. हे प्रकरण लावून धरण्यासाठी मी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे देखील पाठपुरावा करणार आहे. पत्रकार परिषदेत अँड. कीर्ती पाटील यांनी 2018 सालपासून आजवर केंद्रीय मंत्री, राज्य सरकार मधील मंत्री यांनी कशा प्रकारे वागणूक दिली, कशा प्रकारे असहकार्य केले याबाबत माहिती दिली. तसेच तीन वर्षांनी का होईना मात्र या प्रकरणात आता पोलिसांनी निष्पक्षपणे चौकशी करताना दिसत आहेत. त्यांच्यावर काही प्रमाणात राजकीय दबाव देखील दिसून येतो आहे. मात्र राजकीय दबाव झुगारून देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करणार आहोत. चौकशीमध्ये माजी मंत्री गिरीश महाजन यांचे लेटरपॅड सापडले. याबाबत विचारले असता एकनाथराव खडसे यांनी सांगितले की, एखाद्याचे लेटरपॅड सापडणे म्हणजे तो व्यक्ती यामध्ये सहभागी आहे किंवा नाही हे मी सांगू शकत नसल्याचे खडसे म्हणाले.
आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासामध्ये हे सर्व सत्य समोर येईल. यामध्ये अनेक मोठ मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे. ठेवीदारांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत सरकारविरोधी संघर्ष सुरू राहणार असल्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी यावेळी सांगितले.