पुणे (वृत्तसंस्था) – सर्व विश्लेषकांच्या अंदाजापेक्षा जास्त रेपो दर कपात रिझर्व बँकेने जाहीर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. रिझर्व बँकेने रेपो दरात 0.75 टक्क्यांची घसघशीत कपात केल्यामुळे त्याप्रमाणात व्यवसायिक बँका ग्राहकांना दिल्या जात असलेल्या कर्जावरील व्याजदरात कपात करणे गृहीत धरले जात आहे. रेपो दरावर रिझर्व बँक व्यवसायिक बँकांना लघु पल्ल्याचेचे कर्ज देत असते. व्यवसायिक बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणारे भांडवल स्वस्त झाल्यानंतर व्यवसायिक बँकाही ग्राहकांना स्वस्त भांडवलाचा पुरवठा करीत असतात. पतधोरण जाहीर करताना रिझर्व बॅंकेने व्यवसायिक बँकांनीही कर्जावरील व्याजदरात शक्य तितक्या लवकर कपात करावी अशी सूचना केली आहे. मंदी आणि करोना व्हायरस मुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी नागरिकांनी भांडवलाचा जास्तीत जास्त वापर करावा अशी भूमिका रिझर्व बँकेचे आहे. यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. रिझर्व बँकेच्या या निर्णयाचे अर्थातच नागरिकांनी, बँकांनी आणि उद्योजकांनी स्वागत केले आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये रिझर्व बँकेने नागरिकांना आणि उद्योगांना एक पाऊल पुढे येऊन अपेक्षेपेक्षा व्याजदरात जास्त कपात केली आहे असे उद्योजकांनी सांगितले. यामुळे परिस्थिती बरीच सुधारण्याची शक्यता आहे. रिझर्व बँकेने व्याजदरात कपात करूनही आगामी काळातही आणखी कपात करण्याची शक्यता खुली ठेवली आहे. काही विश्लेषकांनी सांगितले की यामुळे महागाई थोडेफार वाढण्याची शक्यता आहे. असे असले तरी सध्याच्या परिस्थितीचा विचार करून ऑगस्ट महिन्यापर्यंत रिझर्व बँक आणखी व्याजदरात कपात करण्याची शक्यता असल्याचे विश्लेषकांना वाटते. रिझर्व बँकेने व्याजदरात मोठी कपात जाहीर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँकेच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. सध्याच्या काळात व्याज दर कपातीमुळे मध्यमवर्गीयांना आणि उद्योजकांना मदत मिळणार आहे. आगामी काळातही अर्थव्यवस्था लवकर रुळावर यावी याकरिता रिझर्व बँक आणि केंद्र सरकार समन्वयाने प्रयत्न करणार असल्याचे मोदी यांनी सूचित केले.