खा. डॉ. सुभाष भामरे यांचे पत्रपरिषदेत माहिती
जळगाव (प्रतिनिधी) – भारताच्या सीमेवर पाकिस्तान देश सातत्याने त्रास देत आहे. भारताने पाकिस्तानच्या त्रासाला नेहमी चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताने याआधी दोन वेळा सर्जिकल स्ट्राईक केले आहेत. पाकिस्तानने त्रास देणे थांबविले नाही तर भारताकडून पाकिस्तानवर लवकरच तिसरा सर्जिकल स्ट्राईक करण्यात येईल अशी माहिती भाजपचे माजी संरक्षण राज्यमंत्री तथा खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिली आहे.
राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षभराच्या कार्यकाळात महाविकास आघाडी सरकारने जनहिताचे कोणत्याही प्रकारचे निर्णय घेतले नसल्याचा आरोप करत भाजपकडून विरोधी पक्ष म्हणून भूमिका मांडली जात आहे. याच अनुषंगाने खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी रविवारी दुपारी जळगावात पत्रकार परिषद घेतली.
महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीबद्दल बोलताना डॉ. सुभाष भामरे म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकारला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. पण गेल्या वर्षभरात सरकारने जनहिताचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. सर्वच आघाड्यांवर महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरले आहे. वर्षपूर्तीच्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याच्या विकासाच्या दृष्टीने काहीतरी विधायक घोषणा करतील, अशी अपेक्षा असताना निराशा केली.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याची अवस्था खूपच बिकट झाली आहे. कोरोनासारख्या महामारीत राज्यातील जनतेचे खूप हाल झाले. कोरोनाच्या नियंत्रणात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले. देशात दुर्दैवाने कोरोनाची परिस्थिती महाराष्ट्रात सर्वात गंभीर आहे. राज्यातील मृत्यूदरही चिंताजनक आहे. राज्यातील जनता अक्षरशः हैराण आहे. शेतकरी, व्यापारी, उद्योजक, मजूर, सर्वसामान्य नागरिक एवढेच नाही तर विद्यार्थीवर्गही सरकारच्या निष्क्रियतेमुळे नाराज असून, सर्वच घटकात तीव्र असंतोष आहे, असेही डॉ. सुभाष भामरे म्हणाले. याप्रसंगी आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर उपस्थित होते.