पारोळा (प्रतिनिधी) – तालुक्यातील बहादरपूर येथे बद्री नारायण भगवानच्या जयघोषात व शहनाई चौघडाच्या तालावर रविवारी बद्रीनारायण भगवानांचा रथोत्सव अत्यंत साध्यापध्दतीने साजरा करण्यात आला. यंदा कोरोनाचा पार्श्वभूमीवर रथाचे जागेवरच पूजन करण्यात आले. तद्नंतर रथोत्सवाची परंपरा खंडित न होऊ देता पाच पावले ओढून रथोत्सव साजरा करण्यात आला.
बहादरपूर येथील बद्रीनाथ महाराजांचा रथोत्सव व यात्रा उत्रोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले होते. त्यानुसार आज मंगल वाद्य वाजून ८० वर्षांची परंपरा कायम ठेवत रथोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला आहे.
८० वर्षाची ऐतिहासिक परंपरा यात्रा उत्सवाला असून परंपरा खंडित न होऊ देता काही मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत दुपारी बारा वाजता बद्रीनाथ महाराजांची महाआरती झाल्यानंतर बद्रिनारायानच्या जयघोषात अत्यंत साध्या पद्धतीने रथ ओढला. रथोत्सामुळे गावात मात्र चैतन्यमय वातावरण होते.
रथोत्सवाप्रमाणे वहन उत्सव देखील साजरा व्हावा अशी गावकऱ्यांची इच्छा होती परंतु वहन उत्सव रद्द केल्यामुळे भाविकांचा हिरमोड झाला. वहन सजवले गेले नसून वहनावर बद्रीनारायण भगवानांची मूर्ती देखील ठेवली गेली नसल्याने भाविकाचा हिरमोड झालेला दिसून आला. दरम्यान, पंचक्रोशित प्रसिध्द अशी कुस्त्यांची दंगल यावर्षी रद्द करण्यात आली. दरवर्षी या दंगलीसाठी राज्यभरातील मल्ल पालखीच्या दिवशी येथे येत असे.
अत्यंत शिस्तीत रथोत्सव साजरा साजरा झाला. रथाच्या वीस फुट लांब बॅरिकेट लावल्यात आले असून भाविकांना लांबूनच दर्शन घ्यावे लागले. अवघ्या काही मिनिटातच रथावरून मूर्ती उतरविण्यात आल्याने अनेक भाविक दर्शनापासून वंचित राहिले.
वाजंत्री वाजल्याशिवाय रथ जागेवरुन हालत नाही, अशी भाविकांची श्रध्दा आहे. मात्र यावर्षी कोरोनामुळे वाजंत्री, लेझीम, काठी फिरवणे आदींना बंदी असल्यामुळे रथ अर्धातास जागेवरुन हाललाच नाही, मात्र, ज्यावेळी मंगल वाद्य वाजविण्यात आले त्यावेळी रथ जागेवरुन पुढे सरकला असे भाविकांकडून सांगण्यात आले.