खोट्या कंपनीच्या तिघा संशयित भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) – लक्ष्मी फायनान्शिअल सर्व्हिसेस नावाने खोटी कंपनी उघडून सात कर्मचाऱ्यांची भरती केल्यानंतर त्यांच्यामार्फत खोटे दस्तावेज तयार करून ग्राहकाकडून कर्जप्रकरण पास करून देण्याचे आमिष दाखवत शेकडो लोकांकडून प्रत्येकी दोन हजार रुपये उकलण्यात आले. यानुसार कर्मचाऱ्यांसह नागरिकांची एकूण १६ लाख ६६ हजार ९०० रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
खंडेराव बापू महाले (वय-२८,रा. हरिविठ्ठल नगर) यांनी फिर्याद दिली आहे. लक्ष्मी फायनान्शिअल सर्व्हिसेस रामानंदनगर येथील आशिष अशोकराव जामेकर, आश्विनी दांडी दोघे रा. स्नेहल नगर, सेवाग्राम रोड, वर्धा व पंकज सर्जेराव पाटील रा. वावडे ता. अमळनेर यांनी ३ मार्च २०२० रोजी फिर्यादीची मुलाखत घेऊन दरमहा १५ हजार रुपये पगाराची हमी देऊन लक्ष्मी फायनान्शिअल सर्व्हिसेसमध्ये फिल्ड एक्सीक्युटीव्ह म्हणून नियुक्ती केली. सोबत इतर सहकारी जितेंद्र रमेश काळे रा. शिवाजीनगर, संतोष अशोक पझई रा. जुना खेडी रोड, दीपक अरुण महाजन रा. भुसावळ, गजानन शाळीग्राम शिसोदे, नीता भीमराव पाटील दोघे रा. पारोळा, धनश्री विकास बडगुजर रा. अमळनेर यांनाही नियुक्ती देण्यात आली होती. त्यानंतर सर्व संबंधितांना वित्त संस्थांमधून कर्ज प्रकरण मजूर करून घेण्यासाठी मार्गदर्शन आवश्यक असणाऱ्या लोकांची माहिती घेऊन त्यांची कर्जप्रकरणे पंकज पाटील यांच्याकडे सादर करून प्रत्येकी दोन हजार प्रमाणे रक्कम स्वीकारून ती पंकज पाटीलकडे जमा केली. आशिष जामेकर याने कर्जप्रकरणाच्या फाईली तपासून सह्या केल्या आहेत. सदर जमा केलेले प्रत्येकी दोन हजार रुपये रक्कम संबंधित तिघा संशयितांकडे वेळोवेळी जमा केली त्यामुळे या रक्कमांचा मी व माझ्या सहकाऱ्यांचा त्याच्याशी संबंध नाही असे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादीत पुढे म्हटले आहे की, दरमहा ठरलेले वेतनही दिलेले नाही. तसेच आशिष जामेकर याने ६० हजार रुपयांचा धनादेश देखील न वटल्यामुळे फसवणूक केली आहे. तसेच अँड. शाम पाटील यांच्या समक्ष ४५ दिवसाच्या आत रक्कम देण्याचे नोटरी लिहून देखील आद्यपि रक्कम दिलेले नाही. तरी आशिष जामेकर, पंकज पाटील, अश्विनी दांडी यांनी खोटे दस्तावेज तयार करून ग्राहकाकडून कर्जप्रकरण पास करून देण्याचे आमिष दाखवत ग्राहकांकडून आमच्यामार्फत प्रत्येकी दोन हजार प्रमाणे एकूण ६९ सभासदांचे व फिर्यादींचा ८ महिन्यांचा पगार असा २ लाख ५८ हजार तसेच इतर सहकाऱ्यांचा असे सर्व मिळून १६ लाख ६६ हजार ९०० रुपये इतकी आर्थिक फसवणूक तिघेही संशयितांनी केली आहे. म्हणून रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपस हेकॉ. प्रवीण जगदाळे करीत आहेत.







